Welcome You All

RSS
Showing posts with label ऊस. Show all posts
Showing posts with label ऊस. Show all posts

ऊस

ऊस पिकासाठी मध्यम ते भारी प्रकारची, चांगल्या निचऱ्याची, क्षारांचे प्रमाण कमी असणारी, पीक पोषक घटकांची उपलब्धता योग्य प्रमाणात असणारी जमीन निवडावी. गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येतो. या रासायनिक गुणधर्माचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होत असतो. म्हणून शिफारस केलेल्या ऊस जातीची निवड करावी. 
1) लवकर पक्व होणाऱ्या जाती ः कोसी 671, को 8014 , को 7219 , को 92005 
2) मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती ः कोएम 7125, को 86032 , को 7527, को 94012 
उत्तम गूळ तयार करण्यासाठी ऊस पिकास सेंद्रिय, रासायनिक व जैविक अशा एकात्मिक अन्नद्रव्ययुक्त संतुलित खतांचा पिकाच्या अवस्थेनुसार वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पोषक अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि उसाची वाढ चांगली होते, त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होतो. याकरिता सुरू उसासाठी हेक्‍टरी 20 टन, पूर्वहंगामी उसासाठी 25 टन आणि आडसालीसाठी 30 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे. शेणखताचा अभाव असल्यास पाचटाचे कंपोस्ट किंवा गांडूळ खत प्रति हेक्‍टरी पाच टन वापरावे किंवा हिरवळीच्या पिकांपैकी धैंचा किंवा ताग घेऊन 45 दिवसांचे झाल्यावर जमिनीत गाडावे आणि नंतर उसाची लागण करावी. ऊसपिकास शिफारशीप्रमाणे भरणीपर्यंत सर्व रासायनिक खतांची मात्रा द्यावी. सुरू उसास 200 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश, पूर्वहंगामी उसासाठी 272 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश, आडसाली उसासाठी 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश ही मात्रा द्यावी. रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये माती परीक्षणानुसार द्यावीत. शिफारशीपेक्षा जास्त व उशिरा नत्रयुक्त दिल्यास रसातील नत्र व ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे गुळाची प्रत खराब होऊन उताराही घटतो. गुळाच्या टिकाऊपणावरही अनिष्ट परिणाम होतो, तसेच नत्र खताची मात्रा लागणीच्या वेळी दहा टक्के, लागणीनंतर 45 दिवसांनी 40 टक्के, 60 दिवसांनी दहा टक्के व उरलेली 40 टक्के 135 दिवसांनी द्यावी. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खते योग्य प्रमाणात दोन हप्त्यात लागणीचे वेळी व 135 दिवसांनी दिल्यास रसाची प्रत सुधारते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ऊस पिकास आवश्‍यकतेनुसार ऊस वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी व पावसाळ्यात गरजेप्रमाणे पाणी द्यावे. ऊस तोडणीपूर्वी कमीत 15 दिवस अगोदर उसाला पाणी देऊ नये. 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll